ठाणे - जिथे धडधाकट मुलांचे संगोपन करणे अवघड असताना आपल्या गतिमंद, दिव्यांग, दृष्टीहीन मुलांचे संगोपन करून त्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम करणे जिकिरीचे काम असते. हे काम करणाऱ्या सुमारे 25 मातांचा शमीम खान यांच्या अध्यक्षतेखालील इत्तेहाद वेलफेयर ट्रस्ट आणि अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे मोहम्मद युसूफ मोहम्मद फारूक खान, महिला अध्यक्ष शबनम शहबुद्दीन रैन यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
रविवारी देशभर मातृदिन विविध पातळ्यांवर साजरा करण्यात आला होता, त्याच अनुषंगाने मुंब्रा बायपास येथील लाल किल्ला या हाॅटेलच्या प्रांगणात शमीम खान यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मुंब्रा, कळवा आणि ठाणे परिसरातील दिव्यांग पालकांच्या मातांना या कार्यक्रमात बोलावण्यात आले होते. या मातांचा शाल, प्रशस्तिपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन शमीम खान आणि युसूफ खान यांनी सत्कार केला. विशेष म्हणजे, सत्कारमूर्ती महिला या अत्यंत गोरगरीब घरातील असल्याने या महिलांना रोजगार देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे शमीम खान यांनी सांगितले.
दरम्यान, ठाणे शहरात प्रथमच अशा पद्धतीने दिव्यांग अपत्यांच्या मातांचा सत्कार करण्यात आला.
*युसूफ खान यांचा सत्कार*
गेली अनेक वर्षे दिव्यांगांच्या हक्क आणि अधिकारांसाठी राज्यपातळीवर संघर्ष करणारे अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे मुख्य संयोजक मोहम्मद यूसुफ मोहम्मद फारुक खान यांची ठाणे महानगर पालिकेच्या दिव्यांग समन्वय समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आलेली आहे. त्याबद्दल शमीम खान यांनी युसूफ खान यांचा या कार्यक्रमात सत्कार केला. तर, या संधीचे सोने करून दिव्यांग बांधवांना आपण त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देऊ, असे युसूफ खान यांनी सांगितले.